Monday, December 31, 2007
"बूम' गर्भाशयाच्या "आऊटसोर्सिंग'मध्ये
भारतामध्ये "बीपीओ' आणि "केपीओ' (नॉलेज प्रोसेसिंग आउट) व्यवसायात सध्या "बूम' आहे, हे सांगण्याची गरज नाही. "बीपीओ'मध्ये आता नवीन व्यवसायाची भर पडली आहे. "सरोगेट मदरहूड' हे त्याचे नाव. ज्या महिलांना गर्भधारणा शक्य नाही (वैद्यकीय किंवा अन्य कारणांसाठी) त्यांच्या अपत्याला जन्म देण्यासाठी स्वतःचे गर्भाशय "भाड्या'ने देणे, असा हा व्यवसाय. सुरवातीला केवळ नातेवाइकांमध्येच अशी "सरोगसी' चालायची; पण गेल्या काही वर्षांत त्याचे झपाट्याने व्यावसायीकरण झाले आहे.यापूर्वी परदेशी मंडळींना भारतात उत्तम पद्धतीने "आयव्हीएफ' (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) सुविधा मिळत असे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात ही सुविधा खूपच स्वस्तात मिळते आणि तीही उत्तम दर्जाची. "सरोगसी' हे त्यापुढील पाऊल आहे. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमला सेल्वराज यांच्या मते हा आता नियमित उत्पन्नाची हमी देणारा व्यवसाय बनला आहे. महिला समुपदेशक हरलीन अहलुवालिया यांच्या अंदाजानुसार गेल्या तीन वर्षांत "सरोगसी'चे प्रमाण दुप्पट झाले आहे. भारतातील लवचिक कायदेशीर प्रक्रिया, स्वस्तामध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा आणि प्रसूतीनंतर निर्माण होणारी कमी गुंतागुंत यामुळे परदेशी मंडळी विशेषतः अनिवासी भारतीयांना "सरोगसी'साठी भारत हे उत्तम ठिकाण वाटते, यात नवल नाही. "सरोगसी'च्या घटना भारताच्या प्रत्येक भागात होत असल्या तरी गुजरातमधील आनंद जिल्हा त्यासाठी कुप्रसिद्ध बनला आहे. तेथील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या किमान पन्नास महिला "सरोगेट मदर' बनलेल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये काही लाख डॉलर मोजावे लागतात, तेच काम ("भाड्याने गर्भाशय') भारतात फक्त अडीच हजार डॉलरमध्ये होऊ शकते. आनंदमधील "आंकाक्षा फर्टिलिटी क्लिनिक'च्या डॉ. नैना पटेल या स्वाभाविकपणे "सरोगसी'च्या समर्थक आहेत. त्या म्हणतात, ""अपत्यप्राप्तीची असमर्थता हा जागतिक प्रश्न आहे, म्हणूनच त्याचे उत्तरही जागतिक पातळीवरच शोधावे लागेल. त्यामुळे तो व्यवसाय नाही; तर समाजासाठी केलेली "सेवा'च आहे.'' "सरोगेट मदर'झालेल्या महिलांचे शारीरिक, मानसिक शोषण होते, त्याचे काय? या प्रश्नावर त्या म्हणतात, ""अशा महिलांची आम्ही उत्तम काळजी घेतो. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आम्ही देतो. त्यामुळे त्यांचे शोषण होण्याचा मुद्दा येतोच कुठे?'' हे समर्थन अनेकांना मान्य नाही. जयपूरच्या महात्मा गांधी वैद्यकीय संस्थेचे प्रमुख डॉ. मोहनलाल स्वर्णकार यांचा "सरोगसी'ला ठाम विरोध आहे. ""यामुळे समाजाच्या नैतिकतेला तडे जातील आणि त्यातून मानसिक आणि नैतिक प्रश्न तयार होतील, की ज्याची सहज उत्तरे मिळणार नाहीत.'' ते पुढे असेही म्हणतात, ""ज्या देशात महिलांवर नेहमीच अत्याचार होत असतात, तिथे भरभक्कम पैशांचे आमिष दाखवून "सरोगेट मदर' होण्यासाठी का भाग पाडले जाणार नाही? तसेच परपुरुषाच्या अपत्याला जन्म देण्यातून निर्माण होणारी मानसिक घालमेल आणि त्यातून स्वतःच्या पतीबरोबरील संबंधांमध्ये निर्माण होणारा तणाव यांना कसे सामोरे जाणार?''
Subscribe to:
Posts (Atom)